सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! २६ नोव्हेंबरला मतदान; २७ ला निकाल

दिनप्रभा प्रतिनिधी | सोलापूर
सोलापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात महत्त्वाची मानली जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. बँकेच्या १९ संचालकपदांसाठी ही निवडणूक होणार असून, २६ नोव्हेंबर रोजी मतदान, तर २७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, २६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. या निवडणुकीत एकूण २ हजार ५९६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ४७ दुग्ध संस्थांचा मतदार यादीत समावेश झाल्याने निवडणुकीतील समीकरणांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
माढा तालुक्यात सर्वाधिक मतदार
उपलब्ध वृत्तानुसार, माढा तालुक्यात सर्वाधिक ४३७ मतदार असून, दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वांत कमी १०८ मतदार आहेत. नव्याने समाविष्ट झालेल्या दुग्ध संस्थांमुळे माढा, पंढरपूर आणि सांगोला परिसरातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सहकार क्षेत्रातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. बँकेच्या संचालक मंडळावर वर्चस्व मिळवण्यासाठी विविध राजकीय गट आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांची चाचपणी, मतदारांशी संपर्क आणि निवडणुकीची रणनीती आखण्याच्या हालचालींना वेग येणार आहे.
या निवडणुकीत कोणत्या गटाला मतदारांचा पाठिंबा मिळतो आणि कोण आपले वर्चस्व सिद्ध करतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
उमेदवारी प्रक्रियेकडे लक्ष
उमेदवारी अर्ज दाखल करणे, अर्जांची छाननी, उमेदवारी मागे घेणे आणि अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणे या पुढील टप्प्यांकडे सहकार क्षेत्रातील पदाधिकारी आणि मतदारांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीतील अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर राजकीय आणि सहकार क्षेत्रातील लढतीचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे.
दिनप्रभा न्यूज पोर्टल व न्यूज चॅनेल
सत्य • समाज • संस्कार
(तक्रार निवारण
दिनप्रभा न्यूज पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या बातम्या संबंधित वार्ताहरांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे प्रसिद्ध केल्या जातात. सदर बातमीतील सर्व विचार, मते व दाव्यांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमीबाबत आपली तक्रार, हरकत किंवा सूचना असल्यास कृपया dinprabhanews@gmail.com या ई-मेल पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे.)




