धोबी-परीट समाजाला अनुसूचित जातीच्या सवलती द्या; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर दिनप्रभा प्रतिनिधी : महाराष्ट्रातील धोबी, परीट, वरठी, रजक, वड्डी, मडवळ, मंडलेवार व धोबा या समाजघटकांचा अनुसूचित जातीच्या यादीमध्ये समावेश होईपर्यंत अनुसूचित जातींना शासनाकडून मिळणाऱ्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सोयी-सवलती विशेष बाब म्हणून लागू करण्यात याव्यात, अशी मागणी अखिल परीट (धोबी) समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, सोलापूरच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. श्री. कार्तिकेयन यांना दिले.
डॉ. दशरथ भांडे समितीच्या शिफारशीवर कार्यवाहीची मागणी
महाराष्ट्रातील संबंधित समाजघटकांची सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने गठीत केलेल्या डॉ. दशरथ भांडे समितीच्या शिफारस क्रमांक ३च्या अनुषंगाने शासनाने सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांसह युवकांना सवलतींची गरज
सदर समाजाचा अनुसूचित जातीच्या यादीमध्ये समावेश करण्यासाठी आवश्यक घटनात्मक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्यास काही कालावधी लागू शकतो. या कालावधीत समाजातील विद्यार्थी, युवक तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण, रोजगार, आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीच्या क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे अनुसूचित जातीच्या यादीमध्ये समावेश होईपर्यंत संबंधित समाजघटकांना अनुसूचित जातींना उपलब्ध असलेल्या शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व इतर आवश्यक सोयी-सवलती विशेष बाब म्हणून तातडीने लागू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
२७ ऑक्टोबरपासून उपोषणाचा इशारा
दरम्यान, या मागणीची शासनाने दखल न घेतल्यास २७ ऑक्टोबरपासून नागपूर येथील संविधान चौकात आमरण साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. आरक्षण समिती तसेच श्री. बळवंतराव साळुंखे (महाबळेश्वर) आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोलापूरमधून शासनाकडे पाठपुरावा
या मागणीसंदर्भात सोलापूर जिल्ह्यातून राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी अखिल परीट (धोबी) समाज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला आहे.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष दिनेश काटकर, तसेच गणेश वारे, दत्तात्रय काटकर, पंकज काटकर, सुभाष गायकवाड, सोमनाथ काटकर, प्रकाश काटकर, राहुल चव्हाण (अनगर), महेश काटकर, अंकुश ननवरे, विष्णू गायकवाड, आकाश ताटवे, सुरज शिंदे, संदीप भोसले, शिवानंद ननवरे, नितीन काटकर, विकास माने आदी पदाधिकारी व समाजबांधव उपस्थित होते.
श्री. गणेश दत्तात्रय शिंदे
सोलापूर विभागीय कार्यकारी संपादक
दिनप्रभा न्यूज पोर्टल | सत्य, समाज, संस्कार




