MPSC परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी; आदित्य ठाकरे यांचे राज्यपालांना निवेदन

दिनप्रभा मुंबई प्रतिनिधी : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षा व शासकीय भरती प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य रश्मी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांना निवेदन दिले आहे. दिनांक २५ सप्टेंबर २०२६ रोजी देण्यात आलेल्या या निवेदनात परीक्षार्थींच्या विविध मागण्यांकडे राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले आहे.
निवेदनानुसार, MPSCच्या विविध परीक्षा व शासकीय भरती प्रक्रियेसंदर्भात निर्माण झालेल्या समस्यांबाबत ११ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षार्थींच्या शिष्टमंडळाने आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन समस्या व तक्रारी मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर MPSCच्या कार्यपद्धतीबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
निवेदनात MPSC बोर्डाचे अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीबाबत जबाबदारी निश्चित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याचे नमूद आहे. तसेच परीक्षार्थींमध्ये आयोगाच्या कार्यपद्धतीबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे.
दरम्यान, MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ ऑक्टोबरमध्ये होणार होती. त्यासंदर्भात परीक्षार्थी उमेदवारांकडून निवेदने प्राप्त झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
परीक्षार्थींच्या वतीने दोन प्रमुख मागण्या
आदित्य ठाकरे यांच्या निवेदनात परीक्षार्थींच्या वतीने पुढील प्रमुख मागण्या राज्यपालांसमोर मांडण्यात आल्या आहेत :
1. व्ही. राधा समितीचा अहवाल प्राप्त होऊन त्याची योग्य अंमलबजावणी होईपर्यंत संबंधित परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात.
2. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे ज्या परीक्षार्थींचे नुकसान होणार आहे, त्यांना वयोमर्यादेबाबत सवलत देण्यात यावी.
निवेदनाच्या शेवटी परीक्षार्थींच्या भवितव्याचा विचार करून त्यांच्या मागण्यांवर गांभीर्याने निर्णय घेण्यात यावा, तसेच परीक्षार्थींचा MPSCवरील विश्वास कायम राहील आणि सर्व परीक्षार्थींना समान न्याय मिळेल, अशी विनंती करण्यात आली आहे.
दरम्यान MPSCकडून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
या घडामोडीनंतर MPSCने राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ तसेच महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि महाराष्ट्र गट-ब मुख्य परीक्षा २०२६ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने २०२५ च्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निर्णयही घेतला असून, सुधारित परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केले जाणार असल्याचे वृत्त आहे.
दिनप्रभा न्यूज पोर्टल
सत्य | समाज | संस्कार





