अध्यात्मपंढरपूरसोलापूर

भोसे येथील स्व. वैजिनाथ दादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन; किरण महाराजांचे हृदयस्पर्शी निरूपण

दिनप्रभा न्यूज | पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर तालुक्यातील भोसे (क) येथे स्व. वैजिनाथ (दादा) कोरके-पाटील व स्व. बाळूमाहादेव (नाना) कोरके-पाटील यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पुष्पवृष्टी किर्तन सेवेला परिसरातील भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठी उपस्थिती लावली.

या प्रसंगी ह.भ.प. डॉ. किरण महाराज बोधले यांनी आपल्या प्रभावी निरूपणातून कुटुंबसंस्कार, वडिलांचे महत्त्व आणि सत्कर्माचे मूल्य यावर हृदयस्पर्शी विचार मांडले. त्यांच्या विचारांनी उपस्थित भाविकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि वातावरण भावनिक झाले.


“बापाची चप्पल दारात असेल तर घराकडे कोणीही वाईट नजरेने पाहू शकत नाही”
किर्तनादरम्यान किरण महाराज म्हणाले,
“बापाची चप्पल दारात असेल तर त्या घराकडे कोणीही वाईट नजरेने पाहण्याची ताकद नसते. आयुष्यात वडील असणे म्हणजे माणसाला मिळालेला सगळ्यात मोठा आधार असतो.”
वडिलांचे छत्र हे केवळ कुटुंबाचे संरक्षण नसून पुढील पिढीला योग्य दिशा देणारी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.

शेवट चांगला व्हायचा असेल तर सत्कर्माची शिदोरी हवी
जीवनाच्या अंतिम टप्प्यावर भाष्य करताना महाराज म्हणाले की, माणसाच्या जीवनाचा शेवट हा पैसा, मोठे घर किंवा संपत्तीवर ठरत नाही.

“माणूस किती पैसा कमावला, किती मोठे घर बांधले याने शेवट चांगला होत नाही. जगताना किती लोकांच्या उपयोगी पडलो, किती सत्कर्म केले यावरच जीवनाचे खरे यश अवलंबून असते.“
त्यांनी उपस्थितांना समाजोपयोगी कार्य करण्याचा आणि संस्कारमूल्ये जपण्याचा संदेश दिला.


मान्यवरांची उपस्थिती
स्व. वैजिनाथ (दादा) कोरके हे नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ. षणमुखी कोरके-पाटील यांचे सासरे होत.
या पुण्यस्मरण कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री. अनिल सावंत, धनश्री परिवारचे श्री. शिवाजीराव साळुंखे, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. तुकाराम मस्के यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोरके-पाटील परिवाराने उपस्थितांचे आभार मानत स्वर्गीयांच्या स्मृती जपत समाजहिताची परंपरा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.

Related Articles

Back to top button