कोल्हापूरगोकुळ दुध संघमहाराष्ट्र राजकारणस्थानिक बातमी

बंटी पाटलांना गोकुळमध्ये धक्का?महायुतीनं कंडका पाडला; गोकुळच्या अध्यक्षपदी राजेश पाटील, चुयेकरांना किती मते?

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अखेर महायुतीने बाजी मारली आहे. महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या निवडणुकीत राजेश पाटील यांना १६ मते मिळाली, तर काँग्रेस आमदार सतेज (बंटी) पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते मिळाली. त्यामुळे गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या समविचारी आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

२५ जागांच्या निवडणुकीत समविचारी आघाडीचे बहुमत

गोकुळच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण २५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने १३ जागा जिंकल्या होत्या. तर महायुतीला १२ जागांवर समाधान मानावे लागले होते. संख्याबळानुसार समविचारी आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र होते. त्यामुळे अध्यक्षपदी शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.

मात्र, अध्यक्ष निवडीसाठी आवश्यक असलेल्या गणपूर्तीचा मुद्दा ऐरणीवर आला आणि गोकुळमधील सत्तासंघर्षाला वेगळे वळण मिळाले.

गणपूर्तीअभावी पहिली सभा तहकूब

गोकुळच्या अध्यक्ष निवडीसाठी यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत आवश्यक १४ संचालकांची उपस्थिती पूर्ण झाली नव्हती. समविचारी आघाडीचे १३ संचालक उपस्थित असल्याने गणपूर्तीचा आकडा पूर्ण होत नसल्याचे कारण देत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सभा तहकूब केली होती.

यानंतर समविचारी आघाडीने न्यायालयात धाव घेतली. अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने १० नोव्हेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आजच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

सरकारने नियुक्त केले चार संचालक; सत्तेचे गणित बदलले

दरम्यान, राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या सहकारी संस्थांमध्ये शासननियुक्त संचालक नेमण्यासंदर्भात निर्णय घेतला. त्यानुसार गोकुळवर चार शासननियुक्त संचालकांची नियुक्ती करण्यात आली. या संचालकांना मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने गोकुळमधील सत्तेचे गणित बदलले.

शिवाजी दिनकर आडनाईक, डॉ. प्रवीणचंद्र रंगनाथ हेंद्रे, प्रशांत भगवान पाटोळे आणि कृष्णात ज्ञानदेव पाटील या चार सदस्यांची शासननियुक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमुळे महायुतीच्या बाजूने संख्याबळ वाढण्याची राजकीय चर्चा सुरू झाली होती.

न्यायालयात याचिका; अध्यादेशाला स्थगिती देण्यास नकार

चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीला समविचारी आघाडीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले. शासनाचा अध्यादेश आणि नियुक्त संचालकांना देण्यात आलेल्या मतदानाच्या अधिकारावर आक्षेप घेण्यात आला.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने शासनाच्या अध्यादेशाला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली. मात्र, चार शासननियुक्त संचालकांची मते स्वतंत्र मतपेटीत घेण्याचे निर्देश दिले. संपूर्ण मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यास सांगण्यात आले. तसेच निवडणुकीचा निकाल जाहीर करता येईल; मात्र संपूर्ण निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील, असे स्पष्ट करण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.

राजेश पाटील यांच्या नावावर अध्यक्षपदाची मोहर

न्यायालयीन घडामोडी, शासननियुक्त संचालक आणि राजकीय हालचालींमुळे गोकुळची अध्यक्षपदाची निवडणूक चांगलीच चर्चेत होती. अखेर आज झालेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार माजी आमदार राजेश पाटील यांनी १६ मते मिळवत विजय नोंदवला. तर समविचारी आघाडीचे शशिकांत पाटील-चुयेकर यांना १३ मते मिळाली.

या निकालामुळे गोकुळच्या अध्यक्षपदावर महायुतीचे वर्चस्व निर्माण झाले असून सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीला अध्यक्षपदापासून दूर राहावे लागले आहे.

गोकुळच्या सत्तासंघर्षात पुढे काय?

गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. तरीही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजेश पाटील यांची निवड झाल्याने सहकारी संस्थांमधील राजकारण, शासननियुक्त संचालकांचा अधिकार आणि न्यायालयीन प्रक्रियेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

२५ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील न्यायालयीन सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे आणि त्यांच्या मतदानाचे भवितव्य स्पष्ट होणार आहे. त्यामुळे गोकुळमधील हा सत्तासंघर्ष अध्यक्ष निवडीनंतरही संपलेला नसल्याचे चित्र आहे.

दिनप्रभा प्रतिनिधी

Related Articles

Back to top button