पंढरपूरपुणे शिक्षक मतदार संघराजकीय

पुणे शिक्षक मतदारसंघातून माजी आमदार दत्तात्रय सावंत सर यांच्या प्रचाराचा पंढरपुरात शुभारंभ; रॅलीतून शक्तीप्रदर्शन

दिनप्रभा प्रतिनिधी | पंढरपूर

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर माजी आमदार श्री. दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवारी (दि. २८ सप्टेंबर) पंढरपुरातील संत नामदेव पायरी येथे उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यकर्ते, शिक्षक मतदार आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार शुभारंभानंतर काढण्यात आलेल्या रॅलीत सहभागी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत राहण्याची भूमिका

प्रचार शुभारंभानंतर दिनप्रभा प्रतिनिधीशी बोलताना दत्तात्रय सावंत सर यांनी शिक्षकांच्या प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

“शिक्षकांच्या प्रश्नांसाठी केवळ बोलणे नव्हे, तर त्या प्रश्नांच्या सोडवणुकीपर्यंत सातत्याने प्रयत्न करणे ही माझी नेहमीची भूमिका राहिली आहे.”

ते पुढे म्हणाले की, विविध मंडळांमधील आवाज असो, प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा असो किंवा शिक्षकांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची वेळ असो, प्रत्येक ठिकाणी शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच, “२५ वर्षांच्या प्रवासात शिक्षकांनी दिलेला विश्वास हीच माझी खरी ताकद असून, यापुढेही हक्क, प्रश्न आणि न्यायासाठी शिक्षकांसोबत राहण्याची बांधिलकी कायम असेल,” असेही त्यांनी सांगितले.

प्रचाराला उत्साहपूर्ण प्रारंभ



पंढरपुरातील प्रचार शुभारंभ कार्यक्रम आणि त्यानंतरची रॅली यामुळे प्रचार मोहिमेला उत्साहपूर्ण प्रारंभ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आगामी काळात शिक्षक मतदारसंघात विविध भागांमध्ये प्रचार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकर्त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button