news politicsमहाराष्ट्र राजकारणराजकीय
दुष्काळावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा; सतेज पाटील यांची सरकारकडे मागणी
दुष्काळावर स्वतंत्र अधिवेशन बोलवा; सतेज पाटील यांची सरकारकडे मागणी
कोल्हापूर | प्रतिनिधी
कोल्हापूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची गंभीर परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने स्वतंत्र अधिवेशन बोलवावे आणि त्या अधिवेशनात लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडण्याची संधी द्यावी, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना पाटील यांनी दुष्काळाच्या मुद्द्यावर राज्य सरकारवर टीका केली. फेब्रुवारी महिन्यातच हवामानाचा अंदाज उपलब्ध असतानाही वेळेत आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे तत्काळ पाठवले गेले नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना केवळ घोषणा न करता प्रत्यक्षात ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळावर सविस्तर चर्चा करून उपाययोजना निश्चित करण्यासाठी स्वतंत्र अधिवेशन बोलवण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या अधिवेशनात प्रत्येक भागातील स्थानिक लोकप्रतिनिधींना आपल्या परिसरातील वस्तुस्थिती मांडण्याची संधी मिळावी. त्यातून शेतकऱ्यांना थेट आणि तातडीची मदत मिळेल, अशा निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.

✍️ कोल्हापूर विभागीय संपादक: श्री. डॉ. सतीश जगन्नाथ दाभाडे





