पंढरपूरपाणी टंचाईमंगळवेढामहाराष्ट्रशेतीस्थानिक बातमी

पंढरपूर-मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; भगीरथ भालके यांची मागणी

पंढरपूर दिनप्रभा प्रतिनिधी :

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी शिवसेनेचे नेते भगीरथ दादा भालके यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले. या निवेदनातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे.

भगीरथ भालके यांनी शासनाने पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे तातडीने करावेत, अशी प्रमुख मागणी केली आहे. पावसाअभावी खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी केलेला बियाणे, खते, औषध फवारणी आणि मशागतीचा खर्च वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय ग्रामीण भागातील पशुपालकांसमोरही चारा टंचाईचे संकट निर्माण होत असल्याने जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा तसेच आवश्यक त्या ठिकाणी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

नागरिक तसेच पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यक व्यवस्था करावी, अशी मागणीही भालके यांनी केली आहे.

पंढरपूर-मंगळवेढा परिसरातील शेतकरी आणि पशुपालकांच्या अडचणींचा शासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भूमिका भगीरथ भालके यांनी निवेदनातून मांडली आहे.

दिनप्रभा न्युज पोर्टल व न्युज चॅनेल

सत्य, समाज,संस्कार.

Related Articles

Back to top button