अक्कलकोटअध्यात्मधार्मिकस्थानिक बातमी

श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये तुळशी विवाह थाटात संपन्न; मंगलाष्टकांनी दुमदुमला मंदिर परिसर!

भक्तीमय वातावरणात धार्मिक विधी, फटाक्यांची आतषबाजी आणि महाआरतीने सोहळ्याची रंगत

दिनप्रभा अक्कलकोट तालुका प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये तुळशी विवाह सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पुरोहितांच्या मंत्रोच्चारात, मंगलाष्टकांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यानिमित्ताने संपूर्ण देवस्थान परिसर आकर्षक फुलांच्या माळा, विद्युत रोषणाई आणि आंब्याच्या पानांनी सजविण्यात आला होता.

या पवित्र तुळशी विवाह सोहळ्यात नवरदेव म्हणून सेवेकरी तुषार मोरे यांनी भूमिका पार पाडली. पुरोहित मंदार महाराज पुजारी आणि व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते विधिवत तुळशी पूजन करण्यात आले. त्यानंतर मंगलाष्टकांच्या गजरात विवाह विधी पार पडला.

देवस्थानचे चेअरमन महेश मालक इंगळे यांच्या अधिपत्याखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुळशी मातेला नववधूप्रमाणे सजविण्यात आले होते. लाल-पिवळ्या फुलांच्या माळा, हळद-कुंकू आणि पारंपरिक अलंकारांनी तुळशी वृंदावन सजविण्यात आले होते.

विवाह विधी सुरू असताना उपस्थित भाविकांनी हातात अक्षता घेऊन मंगलाष्टकांमध्ये सहभाग घेतला. मंगलाष्टकांच्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला होता. विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रथमेश मालक इंगळे, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव, श्रीकांत मलवे यांच्यासह देवस्थानचे पुजारी, सेवेकरी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

कार्तिक महिन्यातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या तुळशी विवाह सोहळ्यामुळे अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, पुजारी वर्ग आणि सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

दिनप्रभा अक्कलकोट तालुका प्रतिनिधी श्री. चंद्रकांत डांगे

दिनप्रभा न्यूज | सत्य, समाज, संस्कार

खुलासा : ही बातमी उपलब्ध माहितीनुसार तयार करण्यात आली आहे. बातमीमध्ये तथ्यात्मक त्रुटी किंवा काही आक्षेप असल्यास वाचकांनी dinprabhanews@gmail.com या ई-मेलवर कळवावे. दिनप्रभा न्यूज योग्य पडताळणी करून आवश्यक ती दुरुस्ती करेल.

Related Articles

Back to top button