पंढरपूरशिक्षणशैक्षणिकस्थानिक बातमी

बालहक्क सप्ताहानिमित्त विवेक वर्धिनी विद्यालयात बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा; विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

सौ. भुसे मॅडम यांचे मार्गदर्शन; बालहक्क संरक्षण व बालविवाहमुक्त समाजनिर्मितीचा सामूहिक संकल्प

दिनप्रभा प्रतिनिधी

पंढरपूर : विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पंढरपूर येथे जिल्हा परिषद, सोलापूरच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार बालहक्क सप्ताह व बालविवाह निर्मूलन अभियानांतर्गत बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमात सौ. भुसे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना बालविवाह ही गंभीर सामाजिक समस्या असून तिचे निर्मूलन करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यांनी बालविवाहाचे सामाजिक, शैक्षणिक, शारीरिक व मानसिक दुष्परिणाम स्पष्ट केले. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदी, बालकांचे मूलभूत हक्क आणि शिक्षणाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी सौ. भुसे मॅडम यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा दिली. मुलींचे वय १८ वर्षे आणि मुलांचे वय २१ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करणार नाही, बालविवाहास प्रोत्साहन किंवा मदत करणार नाही, तसेच बालविवाह रोखण्यासाठी शासन व प्रशासनास सहकार्य करू, असा सामूहिक संकल्प करण्यात आला.

कार्यक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. यू. आर. मुंढे, उपमुख्याध्यापक श्री. ए. ए. पवार, पर्यवेक्षक श्री. कदम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

‘सर्वांचा एकच नारा, बालविवाहमुक्त करू समाज सारा!’ या संदेशातून विद्यार्थ्यांमध्ये बालहक्क संरक्षण आणि बालविवाह निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली.

बालकांचे हक्क जपणे, त्यांचे शिक्षण व सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे आणि बालविवाहमुक्त समाज निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

=======================
खुलासा : सदर बातमी उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. बातमीतील तथ्यात्मक त्रुटी किंवा तक्रार असल्यास वाचकांनी dinprabhanews@gmail.com या ईमेलवर कळवावे. दिनप्रभा न्यूज योग्य पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करेल. AI निर्मित ग्राफिक्स असल्यास ती प्रातिनिधिक समजावीत.

Related Articles

Back to top button