मंगळवेढ्यात तातडीने चारा उपलब्ध करा; फळबागा व शेडनेटधारक शेतकऱ्यांना विशेष पॅकेज द्या!

आमदार समाधान आवताडे यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी; मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
दिनप्रभा प्रतिनिधी मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील तीव्र चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून चारा छावण्या सुरू कराव्यात, तसेच पाण्याअभावी संकटात सापडलेल्या फळबागा आणि शेडनेटधारक शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी आग्रही मागणी आमदार समाधानदादा आवताडे आणि कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्री उपगटाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
मंत्रालयात शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह झालेल्या भेटीत आमदार आवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यांकडे महसूलमंत्र्यांचे लक्ष वेधले. या मागण्यांवर मंत्री बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच फळबागा वाचविण्यासाठी आवश्यक मदत करण्याबाबत आश्वासन दिले.
कर्नाटकातून २०० किलोमीटरवरून चारा आणण्याची वेळ
मंगळवेढा तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. चारा टंचाईमुळे शेतकऱ्यांना कर्नाटकातून तब्बल २०० किलोमीटर अंतरावरून चारा विकत आणावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडत असून पशुधन जगविणेही कठीण झाले आहे.
ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने तातडीने चारा उपलब्ध करून द्यावा आणि चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी आमदार आवताडे आणि कृषिभूषण अंकुश पडवळे यांनी केली.
फळबागांसाठी हेक्टरी सव्वा लाख रुपयांचे पॅकेज द्या!
सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये पाण्याअभावी फळबागा सुकण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या या फळबागा वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा, सेंद्रिय मल्चिंग आणि इतर आवश्यक उपाययोजना कराव्या लागणार आहेत.
या उपाययोजनांसाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा म्हणून फळबागांसाठी हेक्टरी १ लाख २५ हजार रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
शेडनेटधारक शेतकऱ्यांना हेक्टरी ८० हजार रुपयांची मदत द्या!
मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानाशिवाय स्वखर्चाने शेडनेट हाऊस उभारून संरक्षित शेती सुरू केली आहे. मात्र, दुष्काळी परिस्थिती आणि पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी ८० हजार रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार समाधानदादा आवताडे यांनी केली.
महसूलमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद
चारा टंचाई, फळबागांसाठी विशेष आर्थिक पॅकेज आणि शेडनेटधारक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई या तिन्ही प्रमुख मागण्यांबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. जनावरांसाठी तातडीने चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच फळबागा वाचविण्यासाठी आवश्यक मदत करण्याबाबत त्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
या वेळी शिष्टमंडळात कृषिभूषण अंकुश पडवळे, श्री. दिनेश इंगळे, श्री. अंकुश कोळेकर आदी उपस्थित होते.
दिनप्रभा न्यूज, मंगळवेढा तालुका प्रतिनिधी श्री. विक्रम यादव
======================
खुलासा : ही बातमी उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आली आहे. तथ्यात्मक त्रुटी किंवा तक्रार असल्यास dinprabhanews@gmail.com या ईमेलवर कळवावे. दिनप्रभा न्यूज योग्य पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती करेल. AI निर्मित ग्राफिक्स असल्यास ती प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.




